शुभंकराची भुमिका

पार्किन्सन्सशी दोस्तीसाठी काळजीवाहकाची भूमिका

कोणताही आजार पूर्ण बरा होण्यासाठी,आटोक्यात ठेवण्यासाठी औषधोपचाराबरोबर भोवतालचे वातावरण,शुश्रुषा,रुग्णाचा सकारात्मक दृष्टिकोन यांचा मोलाचा वाटा असतो.पीडीसारख्या कायमच्या चिकटलेल्या गुंतागुंतीच्या आजारात तर या सर्वांचे महत्व अधिकच वाढते.यासाठी काळजीवाहक म्हणजेच शुभंकर हा बिन्नीचा शिलेदार असतो.पार्किन्सन्सचे शिक्कामोर्तब झाल्यापासुनच त्याच्या अवघड कामगिरीला सुरुवात होते.पार्किन्सन्समुळे फक्त शारीरिकच नव्हे तर भावनिक मानसिक सामाजिक सर्वच आघाड्यावर समस्याना सुरुवात होते.औषधोपचाराबाबत आपण न्युरॉलॉजिस्टचा आधार घेऊ शकतो पण इतर पातळ्यांवर मात्र शुभंकराचा भक्कम आधार लागतो.तसा मिळाला की या समस्या, समस्या रहात नाहीत.घरभेटी द्यायला सुरुवात केल्यावर हे वास्तव प्रकर्षाने आणि ठळकपणे जाणवले.

पिडीचे निदान झाल्यावर आणि त्याच्या शरीरावर झालेल्या परिणामामुळे रुग्ण म्हणजे शुभार्थी हबकतो दुसर्‍यावर अवलंबून राहावे लागणार या कल्पनेने हताश होतो,पिडी पहिल्या अवस्थेत असला तरी मानसिक धक्क्याने तो स्वत्व आणि आत्मविश्वास गमाऊन बसतो.पिडी ऐवजी त्यामुळेच हालचालीवर बंधने येतात.शुभंकराने स्वतः हताश न होता पीडिविषयीचे ज्ञान वाढवून शुभार्थीला धीर देणे महत्वाचे.वापरा नाहीतर गमवा हे लक्षात घेऊन कितीही वेळ लागला तरी स्वतःची कामे स्वतः करण्यास प्रवृत्त करणे गरजेचे असते.,मनातील गंड नाहीसा करण्यास मदत करणे महत्वाचे ठरते.औषधाचा डोस अ‍ॅडजेस्ट होईपर्यंत रोजच्या घटनांचे निरीक्षण करून डॉक्टरांच्या संपर्कात राहणेही महत्वाचे.बरेचजण औषधांचे दुष्परिणाम असतात या गैरसमजुतीने न्युरॉलॉजिस्टकडे जाण्याचे टाळतात.येथे औषध न घेण्याचे दुष्परिणाम त्याहीपेक्षा जास्त असतात हे लक्षात ठेवावयास हवे.

पिडी झाल्याचे लपवून न ठेवता शेजार्‍याना नातेवायिकाना कल्पना द्यावी.नाहीतर कंपामुळे मद्यपानाचा परिणाम असा लोकांचा समज होण्याची शक्यता असते.त्याचा आधीच मनाने खचलेल्या शुभार्थीवर परिणाम होउ शकतो.या आजारात चढऊतार असतात.औषधाचा डोस घेतल्यावर काहीवेळा परिस्थिती बरी असते.अशावेळी सुशिक्षित लोकही शुभार्थी नाटक करतो याला काही झाले नाही अशी द्षणे देतात.शुभंकरानी या सर्ववेळी शुभार्थीच्या पाठीशी उभे राहून त्याचे मनोधैर्य खचणार नाही हे पाहिले पाहिजे.शुभार्थीसाठी शुभंकर आणि कुटुंबाची भूमिका महत्वाची असली तरी शुभार्थीला नैराश्यातून बाहेर काढणे भारतातील सामाजिक व्यवस्था, ,सोयीसुविधा,शुभंकर आणि कुटुंबीयांची क्षमता यांचा विचार करता शुभंकरालाही आधाराची गरज असते.येथे स्वमदत गट मदतीला येऊ शकतात