Saturday, May 18, 2024
Homeये हृदयीचे ते हृदयीनवीन वर्ष नवीन आशा – ये हृदयीचे ते हृदयी – ९ –...

नवीन वर्ष नवीन आशा – ये हृदयीचे ते हृदयी – ९ – अंजली महाजन

भले बुरे ते घडून गेले,
विसरून जाऊ सारे क्षणभर


खरचं या ओळी किती अर्थपूर्ण आहेत.
चितेला अग्नी देण्यासाठी देखील रक्ताच्या नात्यांना प्रवेश नव्हता,अशा बिकट प्रसंगांना गेली दोन वर्षे आपण सारेच सामोरे गेलो,दुरी,भिती, असुरक्षितता, असहाय्यता हा प्रवास २०२० आणि २०२१ मध्ये खूप क्लेश दायी झाला.पण तरी ही आपण ढळलो नाही,खचलो नाही अतिशय खंबीरपणे मार्गक्रमण करीत आपण येथवर आलो आहोत व ईश्वर कृपेने पुढे ही मार्गक्रमण करणार आहोत. कुणालाही निरोप देताना दु:ख होतं ती जगरहाटीच आहे. पण त्याला नवीन आशेची उमेद, व उत्साहाची किनार आहे,म्हणूनच येणारे नवीन २०२२ हे साल एक सकारात्मकता घेऊन च उजाडलेले आहे .


‌सकारात्मकता असेल,प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची तयारी असेल तर चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागत नाही. आपल्याला आयुष्यात अनेक व्यक्ती भेटतात पण लक्षात घ्या त्या आपल्याला अशाच भेटत नाहीत ते पण आपल्या आयुष्याच पान असतं आपण त्यांच्या कडून काहीतरी चांगलं शिकण अपेक्षित असतं.


आपल्या जगण्याच्या दैनंदिन सर्कशीत कितीतरी गोष्टी करायच्या राहून जातात, कधी कधी वाटतं माणूस फक्त नातं टिकवण्याचाच प्रयत्न करतो,पण त्या ऐवजी त्या नात्यातला जिवंतपणा टिकविण्याचा प्रयत्न केला तर ते नातं छान बहरत फुलत जाईल सुगंधी होईल.
दैनंदिन जीवन जगताना नात्यात फक्त कौतुकाचे दोन शब्द हवे असतात.कौतुकाचे दोन शब्द शंभर हत्तींचे बळ देतात.पण हे करताना आपले मन आखडत असते कौतुक करण्याच्या बाबतीत, आणि एकमेकांचे दोष काढताना ,उणीदुणी काढताना मात्र सगळं दिलखुलासपणे चालू असते.जीवन हे क्षणभंगुर असताना माणूस असा का वागतो?हे एक न सुटणारे कोडेच म्हणावे लागेल.
‌ नवीन वर्ष नव्या आशा घेऊन येत असत आपण त्याच जल्लोषात स्वागत करीत असतो पण थोड्याच दिवसात आपण पुन्हा पहिल्या सारखं वागतो थोड्या थोड्या अंतराने चुका करीत रहातो पण हे योग्य नाही.


नव्या वर्षाची चाहूल लागते ती विविध संकल्पांच्या चर्चेने , नवीन वर्षात काय-काय करायचे आहे?या बद्दल विचार मंथन केले जाते.
संकल्प करताना आत्मविश्वास हवा,तो नसेल तर संकल्प पूर्णत्वास जात नाहीत.केलेले संकल्प मनापासून पूर्ण करणारे ही अनेक जण असतात.काही काही छोटे संकल्प अजिबात कठीण किंवा अवघड नसतात पण यात सातत्य आणि निर्धार महत्वाचा असतो.काही छोटे संकल्प उदा.वेळा पाळणे,व्यायाम करणे,कमी बोलणे,दिलेला शब्द पाळणे, रोजच्या घटनांवर आधारित लेखन करणे म्हणजे डायरी लिहिणे. डायरी मध्ये आपण आपल्या मनातील विविध कल्पना, वाचनातून येणारे विचार,मनात येणारे चांगले विचार, काही चांगल्या अनुभवांचे लेखन, आवडलेल्या चित्रपटाचे,नाटकाचे,पुस्तकाचे, गीताचे लेखन तसेच प्रवासाचे वर्णन लिहू शकतो. डायरी लेखनामुळे मनातील भावभावनांचे विचार कागदावर उतरवले जातात आणि मग सर्व भावभावनांचा निचरा होऊन भावनिक गोंधळ कमी‌ होतो.


‌भूतकाळाच्या संचिताची प्रगल्भ जाणीव राखत, आणि भविष्याचा वेध घेत,वर्तमानाच्या हातात‌ हात घालून चालणे हे माणसाच्या जीवनाचे वैशिष्ट्य आहे.


दोन वर्षे करोना काळात गेल्यानंतर आगामी वर्षात २०२२ मध्ये जीवन पूर्वीच्या स्वच्छंद लयीत आणि आनंदाने जगता यावे या आशादायी विचाराने नवीन वर्षाचे स्वागत सर्वत्र जल्लोषात झाले आहे तेव्हा या वर्षात संकल्प ही जे पूर्ण करणे शक्य आहेत तेच करून ते शक्यतो ते पूर्णत्वास नेऊन‌ आनंददायी व इतरांना शिकवण देणारे कसे ठरतील असे पाहिले पाहिजे.


नवीन वर्षात संकल्प कोणते करता येतील ?उदा.प्रथम स्वतःवर प्रेम करण्याचा संकल्प करा ,वडिलमंडळींना मान देण्याचा ,बचत करण्याचा संकल्प पैसे,पाणी,वीज,अन्न वगैरे ची ,शरीर निरोगी राहण्यासाठी योगा, व्यायाम, ध्यानधारणा, प्राणायाम करण्याचा संकल्प चांगले मित्र जमविण्याचा संकल्प, व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प , समाज सेवेचा, निसर्ग संवर्धन चा संकल्प असे कितीतरी छोटे-मोठे संकल्प करता येतात व आरोग्यदायी आनंदी जीवन जगायला मदत होते.


संकल्पना बरोबर नवीन वर्षात आपली चूक झाली तर ती मान्य करायचे ठरवा,आपली मते दुसऱ्या वर लादत असताना समोरच्याचे मत पण विचारात घ्यायला शिका,चांगल्या कामाची स्तुती करायची हे मनावर बिंबवा,आभार मानायला शिका,सतत हसतमुख रहा, दुसऱ्या मध्ये ही चांगले गुण असतात हे जाणून घ्या, स्वतः ची कुवत आणि ताकद ओळखून जबाबदारी घेण्यास शिका,टिका आणि तक्रार करण्यात वेळ, शक्ती, पैसा वाया घालवून स्वतः चे हस करून घेऊ नका,,कृती करण्यापूर्वी विचार करण्यास शिका,आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्यास शिका, आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्या वर फोडू नका,कधीही कोठेही कोणत्याही क्षणी विचार करुन बोलण्यास शिका,बोलून विचारात पडू नका,नेहमी सत्याची कास धरण्यास शिका, स्वतः चांगले वागून इतरांना चांगली वागणूक देण्यास शिका,


नववर्षात आपण पदापॆण केल्यानंतर आपले मागील वर्ष कसे गेले याचाही आढावा घ्यायला हवा, आपल्या आयुष्यात झालेले बदल नीट समजून घेऊन त्याला अनुसरून यावर्षी स्वतः मध्ये बदल करायला हवेत,


‌‌मागील दोन वर्षे फारच सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक उलथापालथी ची झाली.अनेकांना विविध प्रकारचे अनुभव आले.तेव्हा हे अनुभव गाठीशी धरुन या वर्षी चालत राहण्याशिवाय पर्याय नाही.चांगले आणि वाईट अनुभव प्रत्येकाला जीवनात येत असतात ,त्यातून आपण काय शिकलो ?काय बोध घेतला‌ हे आयुष्यात फार महत्त्वाचे असते.


प्रत्येक चांगल्या वाईट अनुभवाकडे बघण्याची आपल्या ला द्रुष्टी असावी लागते.अनुभवातून शिकायला मिळते आणि त्यातून च पुढे आपली प्रगती होते म्हणून च अनुभव हा फार मोठा गुरू आहे पण त्याची किंमत कधी कधी फार मोठी मोजावी लागते. मागील वर्षी च्या अनुभव तून आपण नवीन आव्हाने पेलण्यासाठी सज्ज होऊ शकतो,व त्यातून यश संपादन करण्यासाठी चा आत्मविश्वास आपल्या मध्ये निर्माण होऊ शकतो. मागचे काही अनुभव वाईट असले तरी मनात सकारात्मक विचार असतील तर मनाला उभारी मिळून आपले आयुष्य बदलून टाकण्यास त्याची मदत होत असते.


नवीन वर्षात मागील चूका टाळून योग्य तो बोध घेऊन नवीन अनुभूती घेतली पाहिजे.झालेल्या वाईट घटनांचा, गोष्टींचा,बाऊ करीत बसलो तर समोर येणाऱ्या चांगल्या संधी ,चा़ंगल्या गोष्टी आपल्याला दिसणारच नाहीत. कोणतीही गोष्ट एकदम साध्य होत नाही पण ती साध्य करण्यासाठी सुरवात महत्वाची असते . सुरवात झाल्यावर आयुष्यात प्रयत्न पूर्वक झालेल्या लहान पण महत्वाच्या बदलांसाठी आपण समाधानी रहायला शिकले पाहिजे त्यातून च पुढे मोठे व चांगले बदल घडून येतात . तेव्हा नवीन वर्षात जे करायचे राहून गेले ते आळस न करता नव्याने सुरू करायचे , नवीन संकल्पांचे इमले पुन्हा उभारायचे,नवे नवे तंत्रज्ञान कवेत घ्यायचे आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे पुढे जात राहायचे.


२०२२ हे वर्ष आपणा सर्वांना भरभराटीचे , सुखसमृद्धीचे,आनंदाचे व आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना .


लेखिका
अंजली महाजन पुणे
०१|०१|२०२२

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क