Saturday, May 18, 2024
Homeआठवणीतील शुभार्थीउषाताई गोगटे - आठवणीतील शुभार्थी - शोभनाताई

उषाताई गोगटे – आठवणीतील शुभार्थी – शोभनाताई

” खुदिको कर इतना बुलंद कि हर तहरीरके पहले
खुदा बंदेको पुछे,’बोल तेरी रजा क्या है’| ”

ऐकायला,लिहायला हे छान वाटत,  प्रत्यक्षात अशा व्यक्ती सापडणे कठीण. पण आमच्या मित्राने,पार्किन्सन्सने आमच्यापर्यंत असे बंदे आणले.उल्हास गोगटे आणि उषा गोगटे हे जोडपे  यातील एक.८१ वर्षांच्या  उषाताईंच ३ ऑगस्ट २०१६ ला निधन झालं.

उषाताईंच्या निधनाने  साठी  ओलांडलेल,परस्पराविषयी प्रेम आदर,कौतुक यांच्या अतूट नात्यात बांधलेलं  सहजीवन रूढार्थाने संपल.त्यांचं सांत्वन करायला गेलेलो आम्ही त्यांच्या आगळ्यावेगळ्या सहजीवनाच्या दर्शनाने थक्क होऊन आणि प्रेरणा आणि ५००० रुपयाची देणगी घेऊन परतलो. होण हीच प्रतिक्रिया असते  उल्हास गोगटे आणि उषा ताई दिवाणे यांच्या घरी झालेल्या डेक्कन गटाच्या सभेत उल्हास गोगटे प्रथम भेटले.ते पूर्णवेळ न थांबता घाईघाईने गेले.पार्किन्सन्स झालेली शय्याग्रस्त  पत्नी,आणि आणि आता ५८ वर्षाचा असलेला विकलांग मुलगा, यांना ते घरी सोडून आले होते.न पाहिलेल्या उषाताईंची ही पहिली ओळख. यशस्वी व्यावसायिक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या गोगटे यांनी इतर सर्व गोष्टी बंद करून पत्नी आणि मुलाच्या सेवेस वाहून घेतलं होत.१००० रुपयाची देणगी त्यांनी दिली.मंडळाला मिळालेली ती पहिली देणगी होती.नंतर अनेकवेळा ते अशीच देणगी द्यायला घाईघाईने येऊन गेले.त्यांचं सर्व लक्ष पत्नी आणि मुलाकडे असे.आम्ही त्यांच्या घरी गेलो तेंव्हा उषाताईना प्रथम प्रत्यक्ष पाहिलं.घरी शय्याग्रस्त कोणी असल की घरात एक उदासवाण वातावरण असत.शय्याग्रस्त व्यक्ती थोडी ओशाळलेली, कंटाळलेली, त्या व्यक्तीकडे पाहायला कोणीतरी पगारी व्यक्ती नेमलेली असते.इथ तर एक शय्याग्रस्त आणि एक विकलांग व्यक्ती.पण उदासवाणेपणाचा मागमूसही नव्हता उलट प्रसन्न वातावरण होत.या दोघांच सर्व काही स्वत: गोगटे करत होते.पगारी माणसे नेमली की झाल असे समजणारे अनेक शुभंकर पाहिले होते,आम्हाला आमच लाईफ नाही का? किती दिवस आम्ही अडकून राहायच? अस विचारणारेही पाहिले होते.कोणताही आव न आणता समर्पित भावाने सर्व काही करणारे गोगटे यांच्यासारखे मात्र विरळाच.

ना .सी.फडकेंच्या कादंबरीतील नायक, नायिका शोभतील असे हे जोडपे.एकमेकाच्या आकंठ प्रेमात बुडालेले. दोघेही सर्वगुण संपन्न.नायक हँडसम,नायिका ब्युटिफुल.नियतीने  यांच्या कथेतील सहजीवनाच्या सुंदर चित्रावर दु:ख,वेदना,हतबलता यांचे वार करत बाधा आणण्याचा प्रयत्न केला.परंतु यांच्या प्रेमाच्या भक्कम पायावर उभ्या असलेल्या सहजीवनाच्या गडद रंगात नियतीचे फटकारे निष्प्रभ ठरले.
पहिला फटकारा १९६४ मध्ये अमरच्या जन्मानंतर मिळाला.त्याच्या जन्माच्यावेळी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उपलब्ध नव्हता.फोर्सेप्स डिलिव्हरी करावी लागली.मेंदूला इजा झाली आणि विकलांगता चिकटली.
जन्मताच सर्व अवयाववरच नियंत्रण गमावलं.पती पत्नींनी हार न मानता त्याला नॉर्मल स्थिती आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले.नॉर्मल नाही झाला तरी दोन गुडघ्यावर, हातावर चालू लागला.अस्पष्ट का असेना बोलू लागला. त्याच्यात आत्मविश्वास निर्माण केला.त्याच्या नाटकाच्या  संगीताच्या आवडीला खतपाणी घातले.त्यावेळी गोगटे उद्योग व्यवसायात गढलेले त्यामुळे जास्त भार उषाताईनीच उचलला.उषाताई स्वत: खेळाडू  होत्या. सुंदर विणकाम भरतकाम करायच्या. त्यांनी आपले सर्व छंद बाजूला ठेवले अमरला घडवले.गोगाटेना कविता करताना शब्द अडला तर तो सांगतो.त्यांनी आपल्याच जीवनावर एक कथाही लिहिली.त्याला नेत्रदान आणि देहदान करायचं आहे. विकलांग  अमरला घडवण्यात,निरोगी आणि सुंदर मन देण्यात या पती पत्नीला किती कष्ट घ्यावे लागले असतील,पेशन्स ठेवावे लागले असतील याची आपण कल्पना करू शकतो.इतर कुटुंबीयांचीही यात मदत होतीच.

१९९६ मध्ये उषाताईंना पार्किन्सन्स झाल्याच निदान झाल.त्यातच अ‍ॅस्टीओपोरोसिसही झाला. जरा कुठ पडल की हाड मोडल अस होऊन अनेक ठिकाणी ऑप्रशन करून  रॉड घालावे लागले.बॅटमींटन चँपियन असलेल्या उषाताई अंथरुणाला खिळल्या.त्यातच ताठरता कमी करणारे पार्किन्सनन्सवरचे महत्वाचे औषध सिंडोपा घेतल्यावर त्याना जोरदार चक्कर येत असे त्यामुळे सिंडोपाच्या गोळ्या  देता येणार नव्हत्या.न्युरॉलॉजीस्ट दिवटे यांनी Pacetane,Amentral या गोळ्या चालू ठेवल्या.अमरबरोबर आता  उषाताईनाही पाहावे लागणार होते. गोगटे ते समर्थपणे करत होते.त्यांच्या खाण्यापिण्याबरोबर, औषधोपचाराबरोबर त्यांचा व्यायाम करून घेणेही ते करत होते.मन आनंदी ठेवण्यासाठी धडपडत होते.घरात बसून कंटाळा येईल म्हणून दोघानाही गाडीतून बाहेर फिरऊन आणत होते. अमरला पुणे युनिव्हर्सिटीच्या परिसरात आवडतो म्हणून बऱ्याच वेळा तेथे ते जात. हे किती कठीण आहे, हे ते या दोघांना एकदा अश्विनिमध्ये सभेला घेऊन आले तेंव्हा लक्षात आल.त्यांनी गाडी अश्विनी हॉटेलच्या अगदी दारापाशी आणली.प्रथम अमरला गाडीतून काढून व्हीलचेअरवर घेतलं.हॉलमध्ये आणून बसवलं.नंतर उषाताईना गाडीतून बाहेर काढून हॉल मध्ये आणल.घरापासून हॉलपर्यंत असा दोघानाही आणण्याचा  मला वाटत विचारही कोणी केला नसता.उषाताईही मन रमवण्यासाठी स्वत:चे मार्ग शोधत होत्या.नामजपाने त्यांच्या अनेक वह्या भरल्या.उषाताईंच्या प्रकृतीत सुधारणा नव्हती तरीही गोगटे काहीना काही उपाय पाहत होते. मध्यंतरी श्री गोखले यांनी पीडी पेशंटच्या घरी जाऊन संमोहन उपचार करण्याची तयारी दाखवली. गोगटे यांनी तो प्रयोग करून पाहिला.उषाताईना त्यामुळे थोडा फायदा झाला.गोखले यांचे व्याख्यान आम्ही मंडळात ठेवले तेंव्हा  आपला अनुभव सांगायला घाईघाईने गोगटे येऊन गेले.सगळ थोड स्थीरस्थावर होत होत तर नियतीला पुन्हा परीक्षा घेण्याची लहर आली.गोगटेना सुधारता येऊ शकत नाही अशी दृष्टीची समस्या निर्माण झाली.कमी दिसू लागल.वाचन लिखाणावर मर्यादा आली.चारचाकी बंद झालीच होती दुचाकीवर जाणही बंद झाल.सेवेत मात्र खंड नव्हता.

आता त्यांच सभांना येण जवळजवळ बंदच झाल.फोनवर संपर्क होता.एकदा त्यांनी ‘पार्किन्सन्स मित्र’ नावाची कविता पाठवली.एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत ‘परका  होता घरचा झाला अखंड नाते जडले’ अस म्हणण, ‘रडण्यापेक्षा मुळूमुळू हा मार्ग मैत्रीचा सुखाचा’ म्हणत पीडीशी हातमिळवणी करण,खरच ग्रेट.आम्ही ही कविता २०१६ च्या अंकात छापली.इतर अनेक छंद असलेल्या गोगटेना घरी राहण्याच्या काळात त्यांच्या कविता सखीने साथ दिली. त्यांच्या कविताच्या पहिल्या वाचक उषाताई असत.काही पटले नाही तर परखडपणे सांगत.उषाताईंच्या मृत्युनंतर तीन चार  दिवस, ही सखी सुद्धा त्यांच्याजवळ जाऊ शकली नाही.६ ऑगस्टला मात्र धीर करून ती जवळ आली. त्यांची ‘भयकंपित अवस्था’ कागदावर उतरली. आम्ही भेटायला गेलो तेंव्हा टेबलवर कवितेची वही होती.’ वर्षा सहल,श्रावण,उषाताईंचा १६ ऑगस्टचा वाढदिवस अशा आठवणीच्या सरीवर सरी अनेक कवितेतून कोसळत होत्या. ‘जाणे तुझे मनाला गेले लुळे करून’.असा विलाप मन करत होत.

त्यांनी यापूर्वी आपल्या एका दीर्घ कवितेत ‘जगावेगळी माझी प्रार्थना देवा प्रथम ने या दोघांना ‘ अस म्हटल होत.हे बुद्धीला समजल तरी प्रत्यक्ष वेळ आल्यावर मन मात्र हा वियोग सहन करू शकत नव्हत.उल्हासराव हळूहळू सावरले.कविता अजून चालूच आहेत पण कवितेची पहिली वाचक मात्र आता नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क