Saturday, May 18, 2024
Homeआठवणीतील शुभार्थीआठवणीतील शुभार्थी - केशव महाजन – शोभनाताई

आठवणीतील शुभार्थी – केशव महाजन – शोभनाताई

कोणीतरी व्हाट्सअप वर मोहम्मद रफी हिट ची लिंक पाठवली आणि सवयीने फॉरवर्ड करण्यासाठी अंजली महाजनला नकळतपणे सर्च करू लागले आणि एकदम थबकले आणि आता केशवराव आपल्यात नाही याची जाणीव झाली. मोहम्मद रफी चे काही आले की मी अंजली ला पाठवायची आणि केशवरावांना ती ते ऐकवायची. ते खुश व्हायचे शोभनाताईनी आपल्यासाठी आठवणीने पाठवले याचाही आनंद असायचा बरेच पार्किन्सन्स शुभार्थी होमस्टर झाल्याने एकटे पडतात. फक्त सहचर पुरेसा पडत नाही. इतर कोणीतरी आपली दखल घेतली ही भावना त्यांना हवीशी वाटते आणि छोटीशी कृती ही यासाठी पुरते.
एका उमद्या व्यक्तिमत्वाला पार्किन्सन्सने होमस्टक केलं होतं.
पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या कार्यकारीणी सदस्य अंजली महाजन यांचे पती केशवराव यांचे 27 जून 2020 ला दुःखद निधन झाले.
अत्यंत हळव्या मनाच्या केशवरांवाना आनंदी ठेवण्यासाठी अंजलीने केलेल्या कल्पक प्रयत्नांची पराकाष्ठा आठवत राहिली. 2008 पासून आमचे केशवरावांशी अत्यंत जिव्हाळ्याचे असे संबंध होते.
सीडीए मध्ये ते
सीनियर ऑडिटर म्हणून काम करत होते. 1980 मध्ये त्यांचा विवाह झाला. 1980 ते 2001 पर्यंत अत्यंत आनंदात संसार होता. दोन हुशार मुली अंजली, केशवराव दोन्ही माणसात रमणारे, लोकसंग्रह मोठा होता. दोघेही कोणाच्या अडीअडचणीला धावून जाणारे. साहित्य, संगीत, सिनेमा, नाटके यात रमणारे.
अंजली चे भाऊ मोरेश्वर मोडक यांनी आमच्या एका स्मरणिकेत ‘एक धीरोदात्त व्यक्तिमत्व केशवराव’ असा लेख लिहिला होता. त्यांच्या आनंदी विनोदी स्वभावाचे वर्णन केले होते. सर्वांना हवेहवेसे वाटणारे केशवराव भावंडात धाकटे.सर्व छान चालले
असतांना
2002 मध्ये या सर्वाला दृष्ट लागली. 19 वर्षांची त्यांची धाकटी मुलगी स्वरूपाला cancer
झाला. वर्षभरात ती गेली. केशवरावांना हा धक्का जबरदस्त होता.
दुसर्या मुलीचा विवाह,वर्षसण,नातवंडाचे आगमन यातच काही काळ चांगला गेला.थोडे स्थीर होते तोच
पन्नाशीत असलेल्या केशवरावांना 2003 मध्ये पार्किन्सन्स ने गाठले. तीन चार वर्षे त्यांनी कशीबशी नोकरी केली. हळूहळू संगणकावर काम करणे, लेखन काम करणे,आडिट करणे या सर्व गोष्टी अशक्य होऊ लागल्या. स्कूटर चालवणे जमेना. मग स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली.
पत्नीअंजली मुख्याध्यापिका म्हणून शाळेत नोकरीला होती. सकाळी लवकर शाळेला जावे लागेल मुख्याध्यापिका असल्याने अनेक जबाबदार्या असायच्या. घरी यायला वेळ व्हायचा. आम्ही पहिल्यांदा त्यांच्याकडे घर भेटीला गेलो त्यावेळी केशवरावांच्याकडे त्यांच्या वृद्ध आईने दार उघडले. आम्ही बराच वेळ बसलो तरी केशवराव बाहेर येत नव्हते. थोड्यावेळाने आले. त्यांचा ऑफ पीरीएड चालू होता त्यामुळे गोळीचा असर सुरू झाल्यावर ते हालचाल करू शकले होते. त्यावेळी फारशी ओळख नसल्याने त्यांच्या off पिरीएड बद्दल आम्हाला माहीत नव्हते. एकदा बाहेर आल्यावर मग मात्र खूप गप्पा झाल्या सर्व माहिती त्यांनी सांगितली. स्वतःचे घर फिरवून दाखवलं अंजलीचे फोन येत होते मी निघतच आहे जाऊ नका.आल्या आल्या लगेच पदर खोचून ती कामाला लागली. त्या दिवसापासून आमच्या दोन्ही कुटुंबात जवळीक निर्माण झाली ती आजपर्यंत.
कधी पावभाजी केली की केशवराव म्हणायचे काका काकूंना बोलाव आणि त्यांच्या आनंदासाठी आम्ही जायचो. लोकांनी घरी येण्यात त्यांना खूप आनंद असायचा. त्यांना बेळगावचा कुंदा आवडायचा. बेळगावला कधीही गेले तरी मी त्यांच्यासाठी कुंदा आणायची. ते खुश व्हायचे. मग त्यांचा फोन यायचा. कुंदा खाल्ला फार छान होता. आमचे वाढदिवस, नवीन वर्ष, दिवाळी यासाठी त्यांचा फोन आवर्जून यायचा. ‘भयंकर असला जरी तो रीपु. मात कर त्यावरी’ असे स्वतःला बजावत पार्किन्सन्सने कितीही छळवाद मांडला तरी ‘सुखी जीवनाचीच स्वप्ने पाहावी’ अस अंजलीने एका कवितेतून सांगितले होते. केशवरावांनी त्याला साथ दिली.
केशवराव कॅरम खेळण्यात एकदम एक्स्पर्ट होते. त्यांच्याशी कॅरम खेळायला अंजली कोणी ना कोणी शोधायची. स्वतः खेळायची. अजित कट्टी त्यांच्याकडे कॅरम खेळायला गेल्याचे आठवते. अंजलीचे भाऊ मोरेश्वर मोडक त्यांच्या लेखात सांगतात, ते मला कायम हरवायचे.क्वीन कधी मला मिळायची नाही. पण त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून मी जिंकलेले असायचो. त्यांना आनंदी ठेवणे यासाठीच तर होता अट्टाहास. मोडक आणि त्यांची पत्नी विनया, अंजली आणि केशवराव असे स्पेशल गाडी करून केरळ, कर्नाटक, हंपी अशा सहली करून आले. 2 जानेवारी 2013 ते 8 जानेवारी 13 अशी आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ, ताडोबा सहल गेली होती. केशवराव यांची परिस्थिती पाहता एवढ्या मोठ्या सहलीला जाण्याचा निर्णय हे धाडस होते पण डॉक्टरांनी परवानगी दिली होती. वर्ध्यापर्यंत रेल्वेने आणि नंतर बसने सर्व प्रवास होता. येताना नागपूर ते पुणे रेल्वे. नागपूर स्टेशन केवढं मोठं तेथे व्हीलचेअर लागेल असे वाटले होते आनंदवन मध्ये ही व्हीलचेअरची सोय झाली असती पण कोठेही व्हीलचेअर न घेता केशवरावांनी पूर्ण सहल केली. त्यातून त्यांना एक नवीन ऊर्जा मिळाली. त्यांच्या त्या सहलीवरील लेखाची लिंक सोबत दिली आहे. तेथील कुष्ठरोगी शरीराचे काही अवयव नसतानाही ठामपणे आजारावर मात करतात. ताठ मानेने जगतात. आपल्याला तर सर्व अवयव नीट आहेत मग पार्किन्सन्सने खचून
का जायचे ही सकारात्मक ऊर्जा त्यांना सहलीत मिळाली. मंडळाच्या सर्व सहलींसाठी ही आवर्जून हजर राहात. केशवरावांचे राजकुमार चे डायलॉग प्रत्येक सहलीत व्हायचेच. स्वतःच्या निवृत्तीनंतर सहा वर्षे ते अंजली ऑफिसला गेल्यावर वृद्ध आईसह दिवसभर एकटे राहायचे.पण हळूहळू त्यांना एकटेपणा जाणवू लागला.नैराश्य येऊ लागले. ते उठण्या आधीच अंजली शाळेत गेलेली असायची. 2012 मध्ये केशवरावांची अवस्था पाहून अंजलीने मुलगी,जावई सर्वांशी चर्चा करून स्वेच्छानिवृत्ती घेतली. ‘पत्नीची स्वेच्छानिवृत्ती आणि माझी वाढली आनंदी वृत्ती’ असे त्यांच्या लेखात त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या लेखाची लिंक दिल्याने त्यावर जास्त लिहीत नाही.
आता अंजली त्यांच्याबरोबर पूर्णवेळ देण्यास मोकळी झाली होती.
कधी सारसबागेतील कमळे दाखवायला ने, कधी नाटक, सिनेमाला ने असे तिचे त्यांना रमवणे
चालू झाले. असे वेळोवेळी त्यांना तिन जीने उतरवून बाहेर नेणे अंजलीच करू जाणे.एकदा अचानक ती एका कार्यक्रमात भेटली. नवचैतन्य परिवाराचे विठ्ठल काटे यांचा 75 वा वाढदिवस होता. त्यानिमित्त अण्णाभाऊ
साठे सभागृहात गफार मोमीन यांचा मोहम्मद रफी यांनी गायलेल्या 75 गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. आमच्या मागेच अंजली आणि केशवरावांना पाहून मला आश्चर्य वाटले कारण ते दोघे तर हास्यक्लबला जात नव्हते. अंजली म्हणाली, त्यांना मोहम्मद रफीची गाणी आवडतात ना म्हणून आलोय. हे थीएटर जवळ आहे. कोणतेही चांगले कार्यक्रम असले की आम्ही येतो. केशवरावांचा चेहरा आनंदाने फुलला होता. पार्किन्सन्सने थोड्या काळाकरता दडी मारली होती. त्यांच्यासाठी मध्ये भूक लागली तर काही खायला, पाणी, त्यांच्या गोळ्या अशा सर्व सरंजामासह अंजली आली होती.
अशी किती उदाहरणे सांगावी?
पार्किन्सन्सही हटणारा नव्हता. त्याची कुरघोडी चालूच होती अंजली ला आता केअरटेकर ठेवण्याची गरज वाटायला लागली. आपल्यामुळे अंजली आणि इतरांना त्रास होतो हे केशवरावांना जाचत होते. यातच दीड वर्षापूर्वी त्यांच्या
आईचे एकशे पाचाव्या वर्षी निधन झाले. त्या आधीचे त्यांचे आजारपण आणि निधन आईवेड्या केशव रावांना सहन होत नव्हते. आईच्या दुःखातून केशवराव बाहेरच येत नव्हते. आजारामुळे घरात राहावे लागल्याने ही कदाचित ते कंटाळले असतील. अंजली त्याना दुःखातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.जावई,मुलगीही प्रयत्न करीत होते परंतु केशवराव कोषात जाऊ लागले. त्यांनीच हत्यार टाकल्यावर लढणे कठीण होते. तरी शेवटपर्यंत अंजलीने जिद्द सोडली नाही आता त्यांच्या जगण्याची गुणवत्ता घसरत चालली होती आणि उमेदही. मृत्यूला चांगली संधी मिळाली मिळाली.
शेवटचा काही काळ सोडला तर केशवरावांनी पार्किन्सन्स विरोधात धीरोदात्तपणे तोंड दिले. त्यांच्या कितीतरी आठवणी येतच राहतील. अंजलीच्या लेखना खाली केशवांजली असेच येत राहिल आणि या नावाने ते कायम तिच्या बरोबर असतील.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क